हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबार (Dance Bar) सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डान्सबारसंबंधी नव्या कायद्यावर चर्चा झाली आहे. लवकरच हा कायदा विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्य सरकार (State Government) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुन्या कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे.
नव्या कायद्यातील महत्त्वाचे बदल
राज्यात डान्सबार सुरू करण्यासंदर्भात सरकार काही कठोर अटी लागू करणार आहे. त्यानुसार , ग्राहक आणि बारबाला यांच्यात दोन मीटरचे अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. नोटांची उधळण करण्यास मनाई असेल. डान्स फ्लोअरवर एकाच वेळी चारपेक्षा अधिक बारबाला असू नयेत, तसेच ग्राहकांना फ्लोअरवर जाता येणार नाही. बारमध्ये सीसीटीव्ही लावणे अनिवार्य असेल. बारबालांचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. डान्सबारमध्ये धूम्रपानावर संपूर्ण बंदी असेल.
डान्सबार बंदी
2005 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारा वाव आणि महिलांचे शोषण या कारणांमुळे हा निर्णय घेतला होता. मात्र, डान्सबार मालकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचे आदेश दिले.
पुढे, l2016 मध्ये फडणवीस सरकारने ‘महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट 2016’ हा कायदा लागू केला. या कायद्याच्या आधारे राज्यात डान्सबारसाठी कठोर नियम घालण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील डान्सबार मालक आणि त्यात काम करणाऱ्या महिलांनी सरकारच्या या निर्णयाबाबत काही महत्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. यामध्ये, अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी टीका केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा डान्सबार सुरू होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.