Dangerous Stunt Video : रेल्वेच्या छतावर चढून तरुणाची DANGER स्टंटबाजी; हाय-व्होल्टेज तारांना हात लागल्याने जागीच…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. काहीही म्हणजे अगदी काहीही. अगदी जिवावर उदार होतानाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक विविध प्रकारच्या स्टंटबाजी करताना लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. त्यामुळे गेल्या काही काळात स्टंटबाजीचे पराक्रम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरुण भरधाव वेगातील रेल्वेवर स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Dangerous Stunt Video)

रेल्वेने प्रवास करतेवेळी तुम्ही अनेकदा स्पीकरवर ऐकू येणाऱ्या सूचना ऐकल्या असतील. मात्र, या सूचनांचे पालन करणारे फार कमी लोक आहेत. रेल्वेच्या दरवाजावर लटकणे, रेल्वेच्या छतावर चढून बसणे या सगळ्या गोष्टी आजकाल सामान्य वाटू लागल्या आहेत. अशा स्टंटबाजीच्या नादात अनेक लोकांनी जीव गमावला आहे. मात्र, तरीही अशा घटना अद्याप थांबलेल्या नाहीत हे दुर्दैव. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरुण असेच एक धोकादायक कृत्य करताना दिसत आहे.

या व्हिडिओत एक तरुण रेल्वेच्या खिडकीतून बाहेर येतो आणि त्यानंतर रेल्वेच्या छतावर जाऊ लागतो. क्षणिक मजा आणि प्रसिद्धीसाठी हा तरुण आपला जीव धोक्यात टाकताना दिसतोय. (Dangerous Stunt Video) दरम्यान, व्हिडिओत अचानक तरुणाचा हात हाय व्होल्टेज तारांना लागल्याने बेशुद्ध पडताना दसतोय. हा झटका इतका जबरदस्त होता की, तो तरुण जिवंत असेल का? याबाबत शंका आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने नेमके या तरुणाचे काय झाले? ते सांगता येणार नाही.

हा व्हिडिओ X हँडल Brutal Vids नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी हा तरुण जिवंत राहिला नसेल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान एका युजरने म्हटलंय, ‘व्हायरल होण्यासाठी हे लोक ज्या पद्धतीने स्टंट करतात ते स्वतः मृत्यूला आमंत्रण देत आहेत’. तर आणखी एकाने लिहिले, ‘अशा लोकांवर कठोर कायदा बनवा. नाहीतर, आणखी स्टंटच्या नादात किती लोक मरतील काही सांगता येत नाही’. (Dangerous Stunt Video)