पुसेसावळी | कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी आज शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कराड उत्तर मधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदमांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांची मोठी ताकद आहे. 2019 विधानसभा निवडणुक त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली होती. राज्यात मविआ सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे मतदारसंघाच्या विकास कामांना निधी मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र सत्तेवर असताना माजी सहकारमंत्री यांच्या दबावामुळे शिवसेनेने त्यांना वाऱ्यावर सोडले. विकासकामाच्या अनेक फाईल बाजूला टाकल्या त्यामुळे सत्ता असताना देखील धैर्यशील कदम यांची कोंडी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यावेळी त्यांनी आपली खदखद मांडली होती. मात्र त्यांच्या न्याय मिळाला नाही.
राज्यात आता सरकार बदलले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी कदमांची जवळीक वाढली होती. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवबंधन तोडून धैर्यशील कदमांनी अखेर आज मुंबई येथे भाजपा कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रहिमतपूर नगरपालिकेतील विरोधीपक्ष नेते निलेश माने यांचेसह मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. धैर्यशिल कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार आहे. दरम्यान धैर्यशील कदम यांच्या कामाची पध्दत आपल्याला माहिती आहे. अशा धाडसी नेतृत्वाला ताकद देऊन पुढील काळात मतदारसंघातील कामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवेशाच्या वेळी दिली.
विकासाचा बँकलाँग भरून काढणार ः- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासाची कामे रखडली आहेत. माजी पालकमंत्र्यांनी सत्तेच्या काळात आपल्या बगलबच्च्यांचा विकास साधला आहे. गटतट बघून अनेक विकासकामे अडवण्याचे पाप केले आहे. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याबरोबर विकास कामांचा बँकलाँग भरून काढण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश असल्याचे चेअरमन वर्धन अँग्रो कारखाना धैर्यशील कदम यांनी सांगितले.