हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात नामांतराचा विषय चर्चेत आहे. औरंगाबाचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केल्यानंतर आता औरंगाबाद येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे नामांतर करण्याची घोषणा भाजप नेते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढ यांनी केली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महारोजगार मेळाव्यात लोढा बोलत होते.
दौलताबाद किल्ल्याला पुन्हा एकदा देवगिरी किल्ला असे नाव देण्यात येईल,अशी माहिती मंगलप्रभात लोढांनी दिली. मधल्या काळात देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद करण्यात आलं होतं. मात्र आता पुढील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापर्यंत या किल्ल्याचं नाव बदलून पुन्हा देवगिरी किल्ला असं नामकरण करण्यात येईल, असं लोढा यांनी सांगितलं.
दौलताबाद किल्ला महाराष्ट्रातील अद्भुत आश्चर्यांपैकी एक-
औरंगाबाद येथील दौलताबाद किल्ला हे नेहमीच पर्यटनाचे आकर्षण राहील आहे. २८ नोव्हेंबर १९५१ रोजी या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. औरंगाबादपासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरीच होते. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे.