पिस्टूलचा धाक दाखवत पेट्रोलपंपावर भर दिवसा दरोडा; लाखो रुपये लुटून दरोडेखोर पसार

Robbery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – येथून जवळच असलेल्या माळीवाडा येथे भरदिवसा पेट्रोल पंपावर दरोडा पडला आहे. पिस्टल आणि चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी हा धाडसी दरोडा टाकला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. यामुळे परिसरासह व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरात कायद्याचा धाक संपला का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, आज सकाळी नऊच्या सुमारास तोंड बांधून दोन अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना भेटून सांगितले की, आम्ही बाहेरगावाहून आलो आहे. आमच्याकडे असलेले नगदी पैसे संपले असून गुगलपेवर अथवा पेटीएमवर आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो तुम्ही आम्हाला कॅश द्या, असे म्हणत मोबाईलमधील कोड स्कॅन केला. नंतर काही काळ पंपावर घुटमळत पंपाची संपूर्ण पाहणी केली. थोड्यावेळाने ते तिथून निघून गेले. परत एक तासानंतर दहाच्या सुमारास पंपावर येत व्यवस्थापकाच्या रूममध्ये प्रवेश करत तिथे नगदी मोजत असलेल्या व्यवस्थापक व तीन कर्मचाऱ्यांना बंदूक व सुरा रोखत मोजत असलेली रक्कम अंदाजे एक ते सव्वा लाख रुपये घेऊन शहराच्या दिशेने पोबारा केला.

या घटनेनंतर व्यवस्थापकाने दौलताबाद पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत माहिती जाणून घेतली व तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली व तपासाचे निर्देश दिले आहेत. माळीवाडा गावात असलेल्या या पंपावर दिवसा ढवळ्या हा दरोडा पडल्याची खबर परिसरात वाऱ्यासारखी पसरली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.