विशेष प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेल्यातानंतर काँग्रेसवर सत्तास्थापनेचा उशीर केल्याचे आरोप होत आहेत. मात्र निर्णय घेण्यात आम्ही उशीर केला नसून राष्ट्रवादीनेच उशीर केल्याचं खापर काँग्रेसने आता राष्ट्रवादीवर फोडलं. राष्ट्रवादीच्या वेळकाढूपणाचा फटका सत्तास्थापनेचा निर्णय घेताना बसला असल्याचे स्पष्टीकरण आता काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिल आहे. आज राज्यात जो काही प्रकार घडला त्याला राष्ट्रवादी जबाबदार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानेच भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकली. अशी प्रतिक्रिया पटेल यांनी माध्यमांना दिली.
येत्या २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्याने या दिवशी सत्तास्थापनेची घोषणा किंवा खातेवाटपाची घोषणा करावी अशी शरद पवार यांची इच्छा होती. त्यानुसार आमची आज एक बैठक होणार होती. त्यामुळं जो काही उशीर झाला तो आमच्याकडून नव्हे तर राष्ट्रवादीकडून झाला असा खुलासा पटेल यांनी माध्यमांसमोर केला. सध्या या उशीर होण्यामागे नेमकं कोणाचं खरं हे जाणून घेण्यापलीकडे गोष्टी राज्याच्या राजकारणात पुढं सरकल्या आहेत.