कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या एक महिन्यापासून ‘लम्पी स्कीन’ या जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. कराड तालुक्यातील वाघेरी येथील शेतकरी सुलतान फतुलाल पटेल यांच्या खिलार जातीच्या बैलास या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. त्याचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांना ही बातमी समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी डॉ.अनिल देशपांडे, डॉ.अंकुश परिहार, डॉ.सुनील लहाने, डॉ.संजय शिंदे, डॉ.दिनकर बोर्डे, डॉ.मुगलीकर, डॉ.मोटे, डॉ.उंडेगावकर, डॉ.दादस, डॉ.देशमुख, डॉ.शरद घोलप व शेकतरी ग्रामस्थ उपस्थित होते.
लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः खिलार जनावरांना होत आहे, हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.