सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रालयामध्ये वीर पांढरा वाघ आणि भक्ती पिवळी वाघीन या जोडीपासून ३ एप्रिल २०२१ रोजी या भक्ती वाघिणीने दिलेल्या दोन पांढऱ्या बछड्यांपैकी एका बछड्याचा शनिवारी मृत्यू झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार शरीरात रक्तस्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

सिद्धार्थ उद्यानातील या भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर भक्ती वाघिणीमध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती वाघीण पिलांची काळजी घेत नव्हती. तसेच स्वतः दूध पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते.

दरम्यान, 6 एप्रिल रोजी रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना या बचड्यावर तिचा पाय पडला होता. त्यामुळे पिलांना वेदना झाल्या. त्यात बछडा दूध कमी पीत होता. कालांतराने बछड्याने दूध पिणे बंद केले होते. त्यामुळे दोन्ही बछड्यांना आईपासून वेगळे करून दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. पाय पडलेल्या बछडयावर प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. परंतु बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवार, 10 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बछड्याचा मृत्यू झाला.

या बछड्याचे शवविच्छेदन डॉक्टर अश्विनी राजेंद्र पशुधन विकास अधिकारी शासकीय पशु सर्व चिकित्सालय यांनी केले. मृत्यू झालेल्या बछड्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे, वन परिमंडळ अधिकारी ए. डी. तांगडे यांची उपस्थिती होती. यांच्या समक्ष मृत बछड्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार वाघाच्या बछड्याच्या शरीरात रक्तस्राव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.

Leave a Comment