हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीदाराने क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत यांचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे या धमकीला गांभीर्याने घेत नवनीत राणा यांचे स्वीयसहायक विनोद पुंडलिक गुहे यांनी याप्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या तक्रारीच्या आधारावर पोलीस धमकीदाराचा शोध घेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, 3 मार्च रोजी नवनीत राणा यांच्या व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून 2 वाजून 8 मिनिटांनी ऑडिओ क्लिप शेअर करण्यात आली होती. या क्लिपमधूनच नवनीत राणा यांच्याविषयी अश्लील भाषा वापरत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासह धमकीदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचा देखील एकेरी उल्लेख केला. पुढे, “जसा धडा आम्ही अमेरिकेला शिकवला तसाच भारतालाही शिकवू” असे या धमकीदाराने म्हटले.
सांगितले जात आहे की, नवनीत राणा यांना ही धमकी पाकिस्तानवरून देण्यात आली होती. राणा यांना धमकीदाराने दोन ऑडिओ क्लिप पाठवल्या होत्या. यातील एका ऑडिओ क्लिपमध्ये त्यांना शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, नवनीत राणा यांनी काही जणांचा नामोल्लेख करत आपले विचार संसदेत मांडले होते, यावरून त्यांच्यावर आरोप देखील करण्यात आले. आता त्यांना पाकिस्तान अफगाणिस्तानच्या नावाचा उल्लेख करत धमकवण्यात येत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.