प्राध्यापक भरतीचा निर्णय आठ दिवसात – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

औरंगाबाद | अनेक दिवसापासून राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीला स्थगिती देण्यात आली असून येत्या आठ दिवसात प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करावी अशी भूमिका मनोगतात मांडली असता येत्या आठ दिवसात शासन आदेश (जीआर) निघेल असे यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषित केले. अनेक दिवसापासून प्राध्यापक भरती रखडलेली आहे. अशात कोरोनामुळे प्राध्यापक भरतीला स्थगिती मिळाली आहे.

याबरोबरच, कोरोना काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केलेल्या कामगिरीचा उदय सामंत यांनी गौरव केला. दोन कोबी टेस्टिंग लॅब सुरू करणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ असल्याचेही ते यावेळी म्हणाले.