मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे; ठाकरेंचं काँग्रेस- राष्ट्रवादीला आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) मुख्यमंत्री कोण हे आधी ठरवूया, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा आहे असं मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असं आवाहन ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरून थेट भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपण आधी एक शपथ घेऊया किआपण महाराष्ट्राचं हित जपू,. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण यांना झोपवू याची शपथ घ्या. आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत जे महायुतीत बसलेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा सवाल ते करत आहेत. मात्र मी आज सर्वांच्या समोर सांगतो, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेब तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा तुम्हाला पाठिंबा असेल. कारण मी माझ्यासाठी लढत नाही. मी महाराष्ट्रासाठी लढतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आत्ताच मुख्यमंत्री कोण ते जाहीर करा असं आवाहन ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करतो त्याला गाडून टाकतो हा इतिहास आहे असं म्हणत ठाकरेँनी भाजपला इशारा दिला.

ते पुढे म्हणाले, आम्ही ३० वर्ष भाजपसोबत युतीत होतो. भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. त्या बैठकीचे हे ठरायचं कि ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री.. आणि हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी वापरायचो. कारण तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडणार आणि माझ्या जागा तू पाडणार . त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही. त्यामुळे आधी मुख्यमंत्री कोण ते ठरवा आणि मग पुढे जाऊ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीला केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला. या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर विकेट फेकायची, बाकीचे प्लेअर आहेतच खेळणारे, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.