डायल 112 योजनेतंर्गत शहर पोलिसांसाठी 74 दुचाकींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. या पार्श्वभूमीवर डायल 112 या योजनेअंतर्गत पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलीस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शहर पोलिसांसाठी डायल-112 या योजनेअंतर्गत 74 दुचाकी वाहनांचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले, यावेळी श्री.देसाई बोलत होते. कार्यक्रमास सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, अंबादास दानवे, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले, संपूर्ण पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परतेने कार्य करुन अहोरात्र झटत असते. बदलत्या काळानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक क्रियाशीलतेसाठी पोलीस दलास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध झालेल्या वाहनांचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यापूर्वी ग्रामीण पोलीस दलासाठी चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तर शहर पोलिसांसाठी बारा चारचाकी वाहने देण्यात आली होती. आता 74 दुचाकींचा समावेश झाल्याने एकूणच संपूर्ण औरंगाबाद जिल्हा पोलीस दलाच्या सुविधेत भर पडली आहे. त्यामुळे पोलीसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी, गस्तीसाठी, डायल 112 उपक्रमातंर्गत नागरिकांना तत्काळ सेवा देण्यासाठी, दुर्घटनास्थळी तात्काळ पोहचण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पोलीस दल अधिक गतीमान होणार आहे. त्याचबरोबर या वाहनांमुळे पोलीसांची मदत तात्काळ उपलब्ध झाल्याने नागरिकांना वेळेत मदत होणार असल्याचा विश्वासही श्री.देसाई यांनी व्यक्त्‍ केला. यापुढेही पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी दर्जेदार व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहर पोलिसांच्या ताफ्यात 12 चारचाकी व 74 दुचाकी वाहने उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सुभाष देसाई, समिती सदस्य तसेच जिल्हाधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनील चव्हाण यांचे आभार मानले. पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबर विविध उपक्रम राबवावे लागतात. नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असते. डायल 112 हा महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी 112 क्रमांकावर मदतीसाठी संपर्क केल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी तात्काळ पोहचता येईल. तसेच छोट्या-मोठ्या समस्या जागेवरच सोडविणे शक्य होईल, असे त्यांनी संगितले.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत पोलीस दलासाठी चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डायल 112 योजनेअंतर्गत पोलिसांना कोणत्याही भागातील नागरिकांपर्यंत मदतीसाठी पोहचता येईल.

Leave a Comment