फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका, एकनाथ खडसेंचा सल्ला

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणासोबत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील राज्यातील राजकारण पेटले आहे. यामध्येच आता सत्ता दिली तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार अन्यथा संन्यास घेणार अशी घोषणाच फडणवीसांनी केली आहे. त्यावर आता फडणवीस तुम्ही संन्यास घेऊ नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा घोषणा वारंवार करत असतात. त्यांनी या अगोदरदेखील विदर्भाचे वेगळे राज्य झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. मात्र त्यांनी लग्न केले. असा प्रकार आपण पुराणात सुद्धा पहिला आहे. विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केले हा त्यातलाच प्रकार आहे. यानंतर राष्ट्रवादीशी कधीच युती करणार नाही असेदेखील म्हणाले होते पण, भल्या पहाटेचं राष्ट्रवादीसोबत शपथ घेतली!

देवेंद्र फडणवीस यांची ओबीसी आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका आहे. मागच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता पण ती फसवणूक होती. जोपर्यंत जनगणनेचा डाटा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अध्यादेशाला महत्त्व नाही, हे फडणवीस यांना चांगलेच माहित होते. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारकडून डाटा आणला तर राज्य सरकारला त्यावर काम करता येईल. पण केंद्राकडून राज्याला डाटा मिळू द्यायचा नाही, आणि ओबीसींचे आम्हीच पाठीराखे अशी दुटप्पी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.

You might also like