सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशिनची आवश्यकता होती आता अत्याधुनिक मशिन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय थांबेल, असा विश्वास महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. सांगली प्रसूतिगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण महापौर दिग्विजय सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते झाले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आले आहेत.
मिरज प्रसूतीगृह आणि सांगली प्रसूतिगृह याठिकाणी या सोनोग्राफी मशीन बसविण्यात आले आहेत. सांगलीतील प्रसूतिगृहात बसविण्यात आलेल्या या सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण झाले. या सोनोग्राफी मशीनमुळे सांगली शहरातील गरोदर महिलाची मोठी गैरसोय दूर झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, सांगली आणि मिरज प्रसूतिगृहात गरोदर महिलांसाठी मोफत सोनोग्राफीची सोय सुरू झाली आहे.
सांगली प्रसूतिगृहात दर बुधवारी दुपारी 2:30 ते 5 या वेळेत तर मिरजेला प्रत्येक शुक्रवारी दुपारी 2 ते 5 यावेळेत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात पूर्णवेळ सोनोग्राफी तपासणी सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मंगेश चव्हाण, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, दत्तात्रय अष्टेकर, औषध भांडार प्रमुख महेंद्र गोंजारी, आरसीएचचे सुरेंद्र शिंदे, किशोर कोठावळे आदी उपस्थित होते.