सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यावेळी कोरेगाव मतदार संघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत चांगलेच आक्रमक झाले होते.
देगाव फाट्यापासून 1.2 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व अशोक चव्हाण यांना भेटून बजेटमध्ये 6 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून वापरण्यात येत असलेले साहित्य निकृष्ठ दर्जाचे सुरू असल्याचा आरोप आ. महेश शिंदे यांनी केला आहे.
आ. महेश शिंदे यांनी रस्त्याच्या कामाची जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनिअरचे आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप आ. शिंदे यांनी केला असून संबंधित इंजिनिअर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी केली आहे. यावेळी स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. गेली 30 वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी आमदारांकडे केली.