हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून हिंसाचाराच्या आगीत राजधानी दिल्ली धुमसत आहे. ईशान्य दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये रविवारी आणि सोमवारी हिंसाचार उफाळला. त्यानंतर मंगळवारी देखील शहरातील काही भागांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरुच आहेत. यामध्ये आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले आहेत.
हा हिंसाचार प्रामुख्यानं मुस्लिम बहुल भागात घडल्याचं वृत्त मिळत आहे. यावेळी अनेक घरांना आणि खाजगी वाहनांना दंगेखोरांनी लक्ष केलं. दरम्यान, अशा भीतीदायक आणि तणावपूर्ण वातावरणात दिल्लीतील एका भाजपच्या नगरसेवकानं एका हिंसक समुहापासून एक मुस्लीम कुटुंब आणि त्यांचं घर जळण्यापासून वाचवलं. आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवत आपल्या कृतीतून या नगरसेवकानं एक चांगलं आणि सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे. प्रमोद गुप्ता असं या नगरसेवकाचं नाव असून ते यमुना विहार वॉर्डमधील भाजपाचे नगरसेवक आहेत. भाजपाचे नगरसेवक प्रमोद गुप्ता आणि हिंसक जमावाच्या तावडीत सापडलेले शाहीद सिद्दीकी यांच्यात जुने मत्रीचे संबंध आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ”१५० जणांचा हिंसक जमाव काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी करीत आमच्या घराजवळून जात होता. या जमावाने आमच्या घराच्या खाली असणाऱ्या एका बुटिकला आग लावली. हे बुटिक आमच्या भाडेकरुचे होते. तसेच या भाडेकरुंच्या कारची आणि दुचाकीची देखील या जमावाने तोडफोड केली आहे.” अशी माहिती सिद्दीकी यांचेकडून मिळताच, गुप्ता हे सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सोमवारी रात्री देवासारखे धावून आले. गुप्ता यांनी सिद्दीकी यांच्या घराकडे धाव घेत जमावाला पुढील नुकसान करण्यापासून रोखले. गुप्ता यांनी या हिंसक जमावाला थोपवत सिद्दीकी आणि त्यांचे कुटुंब एका जीवघेण्या हल्ल्यातून बचावले, त्यांच्या कुटुंबामध्ये एक दोन महिन्यांचं बाळ देखील आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
delhi-bjp-councillor-in-yamuna-vihar-saves-muslim-family-from-murderous-mob