निजामुद्दीनमधील ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं; तर २४ जण करोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन सर्वच पातळ्यांवरून करण्यात येतंय. पण दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिग जमातच्या मरकजमधील ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळून आल्यानं देशात एकच खळबळ निर्माण झाली आहे. तबलिग जमातच्या मरकजमधील धार्मिक कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाले होते. यादरम्यान अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मरकजमध्ये १२-१३ मार्च दरम्यान मोठ्या संख्येत बाहेरून नागरिक आले होते. ज्यामध्ये विदेशातून आलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश होता.

मरकजमधून आतापर्यंत १५४८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी ४४१ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळून आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत आतापर्यंत ९७ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी २४ जण हे मरकजमधील आहेत. ५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. मरकज प्रकरणी दिल्ली सरकारने सोमवारी रात्रीच एफआयआर दाखल केली आहे. नायब राज्यपाल या प्रकरणी कारवाईचे आदेश देतील. या प्रकरणात अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असं केजरीवाल यांनी सांगितलं. आतापर्यंत करोनाचे जे रुग्ण आढळून आले ते विदेशातून आले होते किंवा त्यांच्या संपर्कत आलेल्यांना करोना झाला होता. पण मरकजमधील प्रकार समूह संसर्गाची पहिली घटना असेल. मरकजमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

दरम्यान, अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये एकत्र येत धार्मिक कार्यक्रम घेणं हा बेजबाबदारपणा आहे. यामुळे देशातील इतर भागांमध्ये राहणाऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. देशातील सर्व मंदिर, मशिद, गुरुद्वारा बंद आहेत. अशा परिस्थितीत असा धार्मिक कार्यक्रम का घेतला गेला, असं म्हणत केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली. मरकजमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमुळे इतरांनाही करोनाच्या संसर्गाची भीती आहे, असं केजरीवाल म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’