औरंगाबाद : आरोग्य व्यवस्थेच्या गलथानपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिन्यांपूर्वी कोरोना बाधित असलेला रुग्ण डेल्टा प्लस व्हेरीयंटने बाधित असल्याचे जिल्हा आरोग्य विभागास रविवारी माहीत झाले. सदर कोरोना बाधित रुग्णाचा स्वब ३ जुलै रोजी देण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट ८ ऑगस्टला प्राप्त झाला आणि आरोग्य विभागाची एकच धांदल उडाली.
डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या संशयित रुग्णांचे स्वॅब घाटी रुग्णालयाच्यावतीने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविले जातात. त्यात वाळूजमधील सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय पुरुष रुग्णाचाही स्वॅब होता. २ जुलै रोजी त्यांनी आरटी-पीसीआर टेस्ट केली होती. ३ जुलैला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी शहरातील हेडगेवार रुग्णालयात उपचार घेतले. पाच दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. सात दिवसांनी इतर त्रास होत असल्याने, त्यांनी पुन्हा नॉन कोविड वॉर्डात उपचार घेतले. आज त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले.
रविवारी रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी सकाळपासून या रुग्णाचा शोध घेत होते. दुपारी या रुग्णांचा सर्व तपशील सापडला. त्यानंतर साथरोग अधिकारी डॉ. एस.एन. बारडकर, डॉ. कुडलीकर यांच्यासह आरोग्य पथक रुग्णाच्या घरी गेले, व त्याची तपासणी करून माहिती घेतली. त्यांच्या घरात पत्नी, मुलगा असून, सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याची सूचना डॉक्टरांनी केली. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या एकूण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्ण बाधित आहे हे जर महिन्याभराने कळणार असेल तर त्यावर उपचार कसा केला जातो ? असा सवाल उपस्थित होत आहे.