कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
ऊस शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी लागणारी खते- बियाणे, औषधे, मजुरी, मशागत व शेतीपंपाचे वीज बिल इत्यादी साधनांचा खर्च दुप्पट- तिप्पट झाला आहे. ऊस शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस शेती तोट्यात गेली आहे. आपल्या शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरासरी 3 हजार रूपयांच्या पुढे पहिली उचल जाहीर केली आहे. या कारखान्यांचा आदर्श घेऊन आपणही उसाची पहिली उचल तीन हजार 500 रूपये दर जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीने केली आहे.
आज ऊस दर संघर्ष समिती सातारा यांच्या वतीने आज पहिल्या टप्प्यात कृष्णा, सह्याद्री व जयवंत शुगर या साखर कारखान्यांना उसाची पहिली उचल 3 हजार 500 रुपये द्यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. आपल्या कारखान्यात उसापासून साखर सोबत इतर उपपदार्थाचे उत्पन्न घेतले जाते. त्याच्या माध्यमातून आपणाला तीन हजार 500 रुपये दर शेतकऱ्यांना देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. तसेच साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी शासन निर्णयानुसार आपला यावर्षीचा ऊसदर वृत्तपत्रातात प्रसिध्द करावा आणि कारखाना कार्यस्थळावर लावण्यात यावा, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सचिन नलावडे, विश्वास जाधव, अधिक सावंत, अमोल करांडे, भागवत भोसले, विशाल पुस्तके, सचिन पाटील, हेमंत पाटील, योगेश झांबरे, काकासो सगरे, सुभाष नलवड़े, दत्ता काळे, अविनाश पवार, विकास पवार, भरत चव्हाण, विक्रम थोरात, उत्तम खबाले, नीलेश पवार उपस्थित होते.