हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमधील कुकुटपल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाने लग्नानंतर मूल होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव राहुल आहे. राहुल आणि त्याची पत्नी रम्या यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. हे दोघे पती पत्नी केपीएचबी कॉलनी येथील वसंतनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. लग्ननाला एक वर्ष होऊनदेखील मूल होत नसल्याने दोघेजण तणावाखाली होते. त्यांनी मूल होण्यासाठी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि औषध उपचारही सुरू होते. त्यातच राहुलला पहिल्यापासूनच मनोविकार होता.
राहुल आणि त्याची पत्नी रम्या यांना सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मूल होण्याच्या ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात जायचे होते. यावेळी राहुलच्या पत्नीने त्याला सोबत येण्याची विनंती केली. यावर तो संतापला आणि रागाच्या भरात घरातून बाहेर पडला. यामुळे त्याच्या पत्नीला चिंता लागली होती की, हा नेमका कुठे गेला असेल आणि ती रात्रभर त्याच्या परतण्याची वाट पाहत होती. मात्र तो काही घरी आलाच नाही.
यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या घरातून जोरात किंचाळण्याचा आवाज आल्यावर रम्या धावत त्या ठिकाणी गेली. तेव्हा राहुलने शेजाऱ्यांच्या घरात दोरीने पंख्याला गळफास घेतला होता. हे पाहून तिला मोठा धक्का बसला होता. राहुलने शेजारच्यांच्या स्वयंपाक घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच कुकटपल्ली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राहुलने आत्महत्या का केली असावी याबाबत त्याची पत्नी व शेजारच्यांकडे चौकशी करण्यात येत आहे.