पुणे । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षही अडचणीत आला होता. त्यांच्यावर बलात्काराचे करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने आरोप मागे घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने आणलेल्या शक्ती कायद्यासंदर्भात अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ”धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार मागे घेतल्याची माहिती मिळाली. खरं तर ही फार विचार करण्याची गोष्ट आहे. तक्रार मागे घेतल्यानंतर शक्ती कायद्यासंदर्भात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, आजा जॉइंट सिलेक्ट कमिटीकडं ते आम्ही दिलंय,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतल्यानंतर अजित पवार यांनी विरोधकांनाही चांगलंच सुनावलं. धनंजय मुंडे यांना नाहक बदनाम करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं, अजित पवार म्हणाले. अशा प्रकराच्या आरोपांमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. हा जो त्रास झाला त्याला कोणी वाली आहे का?,” असा घणाघाती सवाल अजित पवार यांनी केला.
”राजकीय क्षेत्रात काम करत असताना तर नाव कमवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. मात्र, बलात्कारासारखे आरोप झाले की एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होते. लोकांचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. विरोधक हा मुद्दा लगेच हाताशी धरतात. कित्येक महिला संघटना आंदोलन सुरु करतात. मात्र आता सत्य समोर आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याविषयी अनेक वक्तव्यं केली गेली. त्याला जबाबदार कोण असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत कॅबिनेटमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांचा पराभव केला. त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं. जिंकल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने मंत्रिपद दिलं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत होते. मात्र, मागील 8 दिवसांपासून त्यांना भयंकर त्रास दिला गेला. अशा प्रकारामुळे पक्षाची बदनामी होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खुद्द मलाही अनेक प्रश्न विचारले गेले. आमच्यावर धनंजय मुंडे यांना पाठिशी घालण्याचा आरोप केला गेला. मात्र आम्ही फक्त निष्पक्ष चौकशीची मागणी केली, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’