बीड : हॅलो महाराष्ट्र – ड्युटीवरील 60 वर्षीय पोलीस हवालदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत, पाय मोडण्याची व नोकरीतून सस्पेंड करण्याची धमकी चक्क पोलीस उपाधीक्षक असलेल्या अधिकाऱ्याने दिली आहे. हा सर्व प्रकार बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये घडला आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित हवालदाराने या पोलीस उपाधीक्षका विरोधात चक्क गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकार ?
सुनिल जयभाये असं या पोलीस उपाधीक्षकाचे नाव आहे. या अगोदर देखिल सुनिल जयभाये परळीत करुणा शर्मा प्रकरण, अंबेजोगाई शिक्षक मारहाण प्रकरण यामुळे चर्चेत आले होते. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 60 वर्षीय पोलीस हवालदार एस.एच.राठोड हे कर्तव्यावर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये हे ग्रामीण पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांना पोलीस स्टेशनच्या आवारात काही लोक दिसले त्यांनी हवलदार राठोड यांना ‘ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत. तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले’, अशी विचारणा केली. त्यावेळी राठोड यांनी अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी काही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे सांगितले. यानंतर सुनील जायभाये यांनी यांना येथे कशाला बसू देता. तसंच बसण्यासाठीचे सिमेंट बाकडे कशाला ठेवले म्हणत शिवीगाळ केली. ते तोडून टाका असे म्हणत स्वतः बाकड्यावर लाथ मारली आणि तोडून टाकले.
त्यानंतर सुनिल जयभाये यांनी 60 वर्षीय राठोड यांना ‘सिमेंटचे बाकडे तुम्ही स्वतः उचलून बाजूला मांडा’ असे सांगितले. त्यावेळी राठोड यांनी माझा पाय फॅक्चर आहे असे सांगितले तेव्हा सुनिल जयभाये यांनी सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत, तुझा दुसरा पायही फ्रॅक्चर करून टाकीन. तुला सस्पेंड करील, अशी धमकी दिली. तसेच मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावली आता तुझी पण वाट लावतो’, असे म्हणत शिवीगाळ केली. यानंतर पीडित हवालदार राठोड यांनी या पोलीस उपाधीक्षका विरोधात चक्क गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली.