औरंगाबाद : मुलगा होत नसल्याचे सांगत पहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दुसरा संसार थाटला. याशिवाय पहिल्या पत्नीकडे फ्लॅटचे हप्ते फेडण्यासाठी पैशांची मागणी करुन तिला घराबाहेर हाकलले. हा प्रकार 16 ऑक्टोबर 2020 रोजी घडला होता. त्यावरुन पती सचिन शांतवन गायकवाड, सासरा शांतवन बंडू गायकवाड व सासू लता शांतवन गायकवाड यांच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात रविवार, 18 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, एका 38 वर्षीय विवाहितेचा विवाह 12 जुलै 2009 रोजी जालना जिल्ह्यातील सचिन गायकवाड याच्याशी झाला होता. सचिन हा भोकरदन येथील महावितरण कंपनीत लाईन ऑपरेटर असल्याने लग्नानंतर 2018 पर्यंत विवाहिता सासरी राहत होती. त्यानंतर शहरातील सावंगीत फ्लॅट घेतल्यानंतर विवाहिता सचिनसोबत आली. सचिन त्याकाळात विकेंडला शहरात यायचा. त्याचदरम्यान त्याच्यासह सासू-सासरे विवाहितेचा छळ करायचे. फ्लॅटसाठी साडेचार लाख रुपये आणल्याशिवाय घरात घेणार नाही म्हणत सासू-सास-यासह पती देखील विवाहितेला मारहाण करायचा. त्यामुळे विवाहितेने माहेराहून उसनवारी करुन पैसे आणून दिले. त्यानंतर देखील ऑक्टोबर 2020 मध्ये तिला काठीने मानेवर, पायावर प्रचंड मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भोकरदन पोलिसातही तक्रार देण्यात आली होती. सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या विवाहितेने महिला तक्रार निवारण केंद्रात दोनवेळा तक्रार दिली. मात्र, पत्नीने पुन्हा त्रास देणे सुरूच ठेवले.
सासू- सासर्याकडूनही मारहाण : 12 जानेवारी 2021 रोजी फ्लॅटमधील सामान दुसरीकडे हलवताना विवाहितेने जाब विचारताच पती, सासू, सासर्यांनी तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, 27 फेब्रुवारी 2021 रोजी पतीने दुसर्या महिलेशी विवाह केल्याचे समोर आले. त्यासंदर्भात विवाहाचे फोटोही विवाहितेला मिळाले.