हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर नेहमीच भाजपची बाजू घेणारे असा आरोप विरोधक करत असतात. राज्यपालांच्या भूमिकेवरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यातच आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यपालांवर थेट टीका करताना त्यांचा उल्लेख बोगस राज्यपाल असा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहे. हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, त्यांना कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती. पण आत्तापर्यंत जेवढे काही राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं.’ अशा शब्दांमध्ये भुयार यांनी कोशारी यांच्यावर बोचरी टीका केली.
आतापर्यंत राज्यात अनेक राज्यपाल होऊन गेले. पण त्यांनी धर्म, जात, पंथ किंवा पक्ष असा भेदभाव केला नाही. हे सगळे राज्यपाल सर्वांना समान न्याय देणारे होते. ठराविक पक्षाचं धोरण राबवणं हे सध्याच्या राज्यपालांना शोभत नाही. या राज्यपालांनी मिनी मंत्रालय सुरू केलं हे अत्यंत अयोग्य आहे, अस देवेंद्र भुयार म्हणाले.