अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
“पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास आहे” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्राची हवा कशी आहे हे पवार साहेबांना कळालं आहे आणि म्हणुनच त्यांनी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली असे म्हणत फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला. अमरावती येथे आयोजित भाजप शिवसेना संयुक्त महामेळाव्यात ते बोलत होते.
अमरावती येथे भाजपा शिवसेना युतीची पहिली सभा संपन्न झाली. देवेंन्द्र फडणवीस यांच्या सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. ‘मी बालवाडीतून शिक्षण घेत आलो आणि आज या महाराष्ट्राचा मुख्याध्यापक झालो, ज्यांनी आम्हाला मी बालवाडीत आहे असे संबोधले होते त्यांनी स्वतःचा विचार करावा कि कोण कुठे आहे’ फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.
आम्ही आजपर्यंत हातगाडीवाला, रिक्षावाला, मजूर ,शेतमजुर, असंघटीत कामगार यांसाठी योजना आणल्या. श्रम योजनेतून आम्ही काम करणाऱ्यांचे बळ वाढविले. आतापर्यंत दहा लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यातील अडीच लाख लाभार्थी महाराष्ट्रात आहेत’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘सर्वात मोठा देश आहे देशापेक्षा मोठं कोणीच नाही’ असही वक्तव्य अमरावतीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केले.