ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सतिश शिंदे

राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यातच उद्योग विस्तारा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. राज्यातील या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाची बैठक वर्षा निवासस्थानामध्ये पार पडली, त्यावेळी फडणवीस बोलत होते.

ऑस्ट्रेलिया देशातील गुंतवणुक सल्लागार मंडळाने राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ राज्यात भेटीसाठी आले होते. या बैठकीला ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत टोनी हुबर, मुख्य गुंतवणूक अधिकारी डॅमियन ग्रॅहम, गुंतवणूक नियोजन प्रमुख डॅमियन लिलिक्रॅप, इमेर्जिंग मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती कॅरोलिन गोरमन, नॉन कोर मार्केटच्या व्यवस्थापिका श्रीमती एमिली फंग यांच्यासह इतर सदस्य तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव सतीश जोंधळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, परकीय गुंतवणुकदारांची पसंती महाराष्ट्राला आहे. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक ही राज्यात होते. निर्यात क्षेत्रातही राज्याचे काम उल्लेखनीय आहे.राज्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याने राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिताना दिला.

राज्यात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावासह सेवा क्षेत्रातही गुंतवणुकीला भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच राज्यात मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही गुंतवणूक फायदेशीर आहे. तसेच ऊर्जा व या क्षेत्रामधील पुनर्वापर या क्षेत्रातही गुंतवणूक करण्यास मोठी संधी आहे. राज्याने 2025 पर्यंत ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवले असून सध्या राज्यातील गुंतवणुकीसाठी योग्य काळ असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

चार वर्षातील प्रमुख उपलब्धींबद्दल ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये खूप मोठी भर पडली आहे. 300 मीटर लांबीची मेट्रो, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बरलिंक, नवीन विमानतळ यासारख्या मुंबईतील कामांमध्ये 20 बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली असून राज्यातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. याशिवाय जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने राज्यातील 25 हजार गावे पाणीदार झाली आहेत. यामुळे राज्यातील दुष्काळी समस्येवर मात करता आली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join WhatsApp Group

Leave a Comment