हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे खलनायक आहेत, फडणवीसांच्या काळाइतका शिवरायांचा अपमान मोगल, ब्रिटीशांच्या काळातही झाला नाही, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आज मुंबईत हुतात्मा स्मारक चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडी कडून सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. त्यापूर्वी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांचे नाव महाराष्ट्राचा खलनायक म्हणूनच राहील. यापूर्वी भाजपच्या राज्यपालांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं त्यावेळी फडणवीस शांत बसले, त्यांचे मंत्री म्हणतात कि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, यातून नक्कीच काहीतरी चांगले घडेल असं म्हणतात यावर फडणवीस काय बोलले का? असा सवाल संजय राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीस यांचं शिवाजी महाराजांवरील प्रेम हे राजकीय प्रेम आहे, ते पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यांना कधीही शिवाजी महाराजांविषयी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रेम वाटणार नाही. जेव्हा हे सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना शिवरायांचा महाराष्ट्रा तोडण्याचा विदर्भ वेगळा करायचा होता, त्यासाठी लग्न न करण्याची घोषणा सुद्धा फडणवीसांनी केली होती. ते फडणवीस आज आम्हाला सांगतात का? खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शिवाजी महाराजांचा जितका अपमान झाला तितका अपमान तर मोगल, ब्रिटीशांच्या काळातही झाला नसेल असं म्हणत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जनता नामर्द नाही. आम्ही शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरतोय. लोकशाही मध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावी लागते. आम्ही आज फक्त जोडो मारो आंदोलन करत आहोत, शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. आम्ही आंदोलन करतोय म्हणून तिकडे भाजपची लोक सुद्धा आंदोलन करत आहेत हे हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे. यांची डोकी फिरविली आहेत. भाजपचे मूर्ख लोक आमच्या विरोधात म्हणजे शिवरायांच्या विरोधात आंदोलन करत आहे असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं.