हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. वांद्रे फॅमिली कोर्टाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे. फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांच्या दाव्याला मान्यता देत मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून करुणा शर्मा यांना स्वीकारले आहे. तसेच, कोर्टाने करुणा शर्मा (Karuna Sharma) यांना दरमहा 2 लाख रुपये देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा गेल्या काही वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्याविरोधात कायदेशीर लढा देत होत्या. आपण धनंजय मुंडे यांची पत्नी आहोत, असा त्यांनी दावा केला होता. मात्र, हा संबंध अधिकृतरीत्या मान्य करण्यास मुंडे यांनी नकार दिला होता. त्यामुळे करुणा यांनी फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा ग्राह्य धरला आहे. यासह करुणा शर्मा यांना मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली आहे.
याशिवाय, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचेही आरोप लावले होते. याबाबत अंतिम निर्णय अजून बाकी असला, तरी न्यायालयाने मुंडे यांना पुढील आदेश येईपर्यंत करुणा शर्मा यांच्याविरोधात कोणताही हिंसाचार करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोर्टाच्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे:
- आरोप मान्य – करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले काही आरोप कोर्टाने मान्य केले आहेत.
- घरगुती हिंसाचार प्रकरण – अंतिम निकाल येईपर्यंत मुंडे यांनी कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे.
- पोटगी देण्याचा आदेश – धनंजय मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
- खटल्याचा खर्च भरावा लागणार – न्यायालयाने २५,००० रुपये खटल्याचा खर्च मुंडे यांनी करुणा शर्मा यांना देण्याचा आदेश दिला आहे.