धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटायला आले होते; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

0
3
jarange, munde, karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडाचे प्रकरण सर्वात जास्त चर्चेचा भाग बनले आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आपल्या भेटीला आल्याचा धक्कादायक दावा केला. जरांगे यांनी सांगितले की, “गेल्या आठ दिवसांपासून धनंजय मुंडे यांचे फोन येत होते. अखेर रात्री 2 वाजता ते माझ्या घरी आले, त्यांच्यासोबत वाल्मिक कराडही होता. त्यांनी कराडची ओळख करून दिली आणि मला त्याला ‘सांभाळून घेण्याची’ विनंती केली.”

तसेच, “मी झोपेत होतो, तरीही ते आत आले. मी त्यांना सांगितले की, हा तर शेतकऱ्यांचे हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा माणूस आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी ‘त्याकडे लक्ष देऊ नका’ असे सांगितले. निघताना ते माझ्या पाया ही पडले.” असे माध्यमांना जरांगे यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी दावा केला की, “संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटामागे एक मोठी यंत्रणा आहे. धनंजय मुंडे यांची टोळीच आरोपींना पाठीशी घालत आहे”

दरम्यान, मनोज जरांगे यांनी केलेले हे आरोप अत्यंत गंभीर असल्यामुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, जरांगे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. तर सर्वांच्या भुवया धनंजय मुंडे यांच्याकडे उंचावल्या आहेत.