टीम हॅलो महाराष्ट्र | राजकीय नेता, मग ती स्थानिक पातळीवरील असो किंवा राष्ट्रीय. लोकांमधील आपल्या नावाची चर्चा त्याला नेहमीच हवीहवीशी वाटत असते. प्रत्येक नेत्याला लोकनेता व्हायची इच्छा असो वा नसो, पण लोकांनी किमान आपल्याला ओळखावं एवढी तरी अपेक्षा त्याची नक्कीच असते. काही नेते आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित राहतात तर काहींना राज्यभर ते वलय मिरवता येतं. मराठवाड्यातील लढवय्या नेता म्हणून ओळख मिळवलेल्या धनंजय मुंडे यांच्या बाबतीतला एक किस्साही असाच आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यानंतर धनंजय मुंडे यांची खूपच वाहवा झाली. बहिणीने आकांडतांडव करुन निवडणूक जिंकण्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर बीडमध्ये धनंजय पर्वाला सुरुवात झाली. अजित पवारांच्या भाजपला साथ देण्याच्या गनिमी काव्यात धनंजय मुंडे सहभागी असल्याची वार्ता बाहेर पसरली आणि धनूभाऊ आता संपतात का अशीही चर्चा सुरु झाली. मात्र समयसुचकता दाखवत धनुभाऊ पुन्हा आपल्या गोटात शिरले आणि राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले. नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाचं कॅबिनेट खातंही मिळालं. आता एवढं सगळं मिळालंय म्हटल्यावर जंगी सत्कार, मिरवणूक, हार-तुरे आलंच की..किस्सा आहे या ठिकाणचाच..
सत्कार सोहळ्यात सर्व माध्यमांची नजर धनंजय मुंडेंकडे असताना धनुभाऊंची गुप्त नजर मात्र या माध्यमांकडेच होती. कोण, कशी आणि किती धडपड करतंय हेच जणू धनुभाऊंनी त्यांच्या माणसांना टिपायला लावलं होतं. सत्काराचं लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या पत्रकारांची धडपड पाहून त्यांच्यासाठी एक संदेश धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर लिहला आहे. यात ते म्हणतात..
आमचंही लक्ष आहे बरं का!
माझ्या नागरी सत्कारावेळी कार्यक्रम लाईव्ह दाखवणाऱ्या पत्रकारांची मी लाईव्ह टिपलेली ही छबी. जीवाची पर्वा न करता, कुटुंबापासून दूर राहून लोकशाही सदृढ करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना माझा सलाम! सरकार पत्रकारांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध असेल.
पत्रकार हा सामाजिक परिस्थितीचं आहे तसं सादरीकरण करणारा महत्वाचा घटक मानला जातो. पत्रकारांना सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींना जोडणारा दुवा म्हणायलाही हरकत नाही. अशा पत्रकारांविषयी कळवळा आता काही लोकप्रतिनिधींनाही येऊ लागला आहे. मागे सुप्रिया सुळे यांनीही टू व्हीलरवर शूटिंग करणाऱ्या पत्रकारांचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता, शिवाय लोकसभेतही पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. आता एवढं सगळं असताना पत्रकारांना अच्छे दिन येणार का याकडे पत्रकारांचंही लक्ष आहे बरं का धनुभाऊ..!!