औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसागणिक अपघातांची संख्या वाढतच चालली आहे त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे. आजही दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. महामार्गावरील अंधानेर बायपास जवळ हा अपघात दुपारी बारा वाजेदरम्यान घडला संजय सखाराम माळवे (25, रा. सातकुंड) व सागर पांडुरंग काळे (30, रा. औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, खासगी बांधकाम कंपनीत अभियंता पदावर असलेला सागर काळे मोटारसायकलने (एम एच 20 एफडी 7577) चाळीसगाव कडून औरंगाबाद कडे जात होता. तर दुसरा दुचाकीस्वार संजय माळवे हा सुद्धा मोटरसायकलने (एम एच 20 एजी 0026) औरंगाबाद कडून सातकुंड येथे चालला होता. अंधानेर बायपास जवळ सध्या एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजु तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी. वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोना रामचंद्र बोधले, पोकॉ एमजी आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तोरण बांधायला जात होता –
आज गणेश चतुर्थी असल्याने गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सागर आपल्या घरी जात होता. घराला बांधण्यासाठी मांगल्याचे प्रतीक समजले जाणाऱ्या आंब्याच्या पानांचे तोरण बांधण्यासाठी आंब्याच्या पानांची पिशवी घेऊन तो घराकडे जात होता. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते, आणि त्याच्यावर काळाने घाला घातला