सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्ह्यातील लाभार्थी जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहातून या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी केंद्र पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात जिल्हा प्रशासन नेहमीच अग्रेसर राहिला आहे. यापुढेही शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना लाभ द्यावा व त्यांचे जीवनमान कसे उंचविले यासाठी सदैव प्रयत्न करावा. ज्या नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ झाला आहे, अशा नागरिकांनी दुसऱ्यांनाही योजनेचा लाभ घेण्याविषयी सांगावे.
अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा आहेत. ज्यांना घरे नाहीत त्यांना शासन घर बांधून देत आहे. ज्यांना अन्न नाही त्यांना शिधापत्रिकेच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करुन देत आहेत. शासनामार्फत शिक्षण, आरोग्य यासह विविध सेवा मोफत दिल्या जात आहेत. तरुणांनी चांगले शिक्षण घेऊन समाजकारणात, राजकारणात व प्रशासन सेवेत यावे व आपल्या जिल्ह्याचा नावलौकीक वाढावावा. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न करा, असे आवानही खासदार श्री. पाटील यांनी केले.
श्री. गौडा म्हणाले, शासनाच्या विविध योजना राबविण्यात सातारा जिल्हा परिषद देशासह राज्यात आघाडीवर राहिली आहे. याची दखल घेऊन केंद्र व राज्य शासनाने अनेक पुरस्कार देवून सातारा जिल्हा परिषदेचा गौरवही केला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत राज्यातील पहिला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प मौजे कोळकी ता. फलटण येथे जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोषण अभियानात सर्वाधिक उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला असल्याचेही त्यांनी सांगितले