काठमांडू । जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत आता तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. माऊंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा सुरू असून नेपाळने या शिखराची उंची मोजण्याचं ठरवलं आहे. 2015 साली नेपाळमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपानंतर माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जगातील अनेक देशांना पडलेल्या या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम नेपाळने हाती घेतलं असून मंगळवारी यासंदर्भात उघडपणे माहिती देण्यात येईल.
गेल्या वर्षभरापासून नेपाळने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी डेटा कलेक्शनचं काम केलं आहे. नेपाळ सर्वेक्षण विभागाने जगभरातील मीडिया चॅनेल्स आणि पत्रकारांना आमंत्रण दिलं आहे. त्यामध्ये, माऊंट एव्हरेस्टसंदर्भातील उंचीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून या कामात स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सुशील नरसिंह राजभंडारी यांनी सांगितलं आहे.
नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच, माऊंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेपाळने यासंदर्भात डेटा गोळा केला असून माऊंट एव्हरेस्टच्या सध्याच्या उंचीबाबत ते मंगळवारी अधिकृत घोषणा करणार आहेत. सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1954 साली घेण्यात आलेल्या मोजमापानुसार माऊंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848 मीटर एवढी आहे. त्यानंतर, 1975 मध्ये चीनी सर्वेक्षकांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी, समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 8,848.13 मीटर उंच सांगण्यात आली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’