सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सातारा येथे दिगंबर आगवणे यांनी सातारा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यासह तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी वेगळा जबाब दिला आहे. त्यामुळे खासदार निंबाळकरांचे अनेक कारनामे बाहेर काढत असताना त्यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. ते माझा कधीही खून करतील, असे धक्कादायक विधान दिगंबर आगवणे यांनी केले आहे.
सातारा येथे दिगंबर आगवणे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रणजित निंबाळकर यांनी माझी फसवणूक केली आहे. या स्वराज नागरी पतसंस्थेत माझ्या नावे 1 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे भासवले पण ते मला मिळाले नाही व त्याच बरोबर इतर प्रकारे माझी फसवणूक केल्याची मी तक्रार दाखल केली होती. तसेच ही पतसंस्था आरबीआयचे नियम तोडून काम करत आहे. तसेच माझ्या नावे कर्ज प्रकरण करताना माझे अख्खे चेक बुक जमा करून घेण्यात आले होते आणि नंतर त्यातील एक चेक स्वराज कारखान्याला देऊन 5 कोटी 51 लाख 12 हजार 302 रुपयांचा चेक भरून त्याचा दुरुपयोग केला आहे.
याबाबत देखील न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. खासदार रणजित निंबाळकर यांनी माझीच फसवणूक केली आहे. मात्र ते काबुल न करता काही माणसे उभी करून उलट माझ्यावरच खोट्या तक्रारी दाखल करणे सुरु आहे. ज्या तक्रारदारांनी माझ्यावर खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्यावर मी न्यायालयात दावा दाखल करणार आहे. त्यामुळे खासदार साहेबांना माझी विनंती आहे कि कृपया लोकांची घरे जाळू नका, असा इशारा आगवणे यांनी दिला आहे.