वक्फ बोर्डाच्या सर्व दस्ताऐवजांचे डिजीटायलेजेशन करणार – खा. फौजीया खान

औरंगाबाद | गेल्या अनेक वर्षापासून हस्तलिखित स्वरूपात असलेल्या वक्फ बोर्डाच्या दस्ताऐवजाचे डिजीटायलेजेशन करण्यात येणार असून त्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार तथा वक्फ बोर्डाच्या सदस्या खा. फौजीया खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच वक्फ बोर्डाच्या मालमत्ता लाटणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सदस्यांची औरंगाबादेत बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीसाठी सर्व सदस्यांच्या संमतीने प्रभारी अध्यक्ष म्हणून खा.फौजीया खान यांची निवड करण्यात आली आहे. खा.फौजीया खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खा.सय्यद इम्तियाज जलील, आ.वजाहत खान, वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा सदस्य एम.एम.शेख, अ‍ॅड.ए.यु.पठाण, मुदस्सीर लांबे आदींची उपस्थिती होती.

वक्फ बोर्डाकडे कोट्यावधी रूपयांच्या मालमत्ता असून त्यांचा योग्य प्रकारे आणि व्यावसायीकरित्या वापर करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वक्फ बोर्डाच्या जमीनीविषयी अनेक तक्रारी व भ्रष्टाचाराची प्रकरणे असून त्यांचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या वतीने शिबीरे आयोजित करून प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. वक्फ बोर्डासाठी राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.