फक्त दारूचा ग्लासच नाही तर प्रेमाची नशाही बेधुंद करते; ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी तरी कोणावर प्रेम केलं असेल. तुम्ही कोणाला याबद्दल सांगितलं असेल किंवा नसेल पण कधीतरी तुम्ही नक्कीच प्रेमात बेधुंद झालेले असणारच . आता याच बेधुंद प्रेमाची नशा तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. होय, यांचे कारण म्हणजे दिल बेधुंद या मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतंच लाँच झालं असून या चित्रपटाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे.

कोणताही चित्रपट जोपर्यंत चित्रपटगृहात प्रत्यक्ष प्रदर्शित होत नाही, तोपर्यंत तो वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत असतो. यामध्ये अर्थात चित्रपटाच्या संगीताचा सर्वात मोठा वाटा असला तरी त्याची पहिली ओळख आपल्याला होते ती पोस्टरपासून! ‘दिल बेधुंद’ या चित्रपटाचं टायटल लाँच झाल्यापासून चित्रपटाची कथा, त्याचं संगीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाची कास्ट, अर्थात त्यातील कलाकार यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘दिल बेधुंद’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच झालं असून त्यात ही कुरकुरीत लव्हस्टोरी प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणारी जोडी अनोख्या अंदाजात दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/Cq1_fP1o-IW/

‘दिल बेधुंद’च्या पोस्टरमधून सर्वात आधी आपलं लक्ष वेधते ती या खुसखुशीत लव्हस्टोरीतली तेवढीच बेधुंद मुख्य कलाकारांची जोडगोळी! हंसराज जगताप आणि साक्षी चौधरी यांच्यातली हटके केमिस्ट्री पोस्टरवरून अगदी सहज लक्षात यावी! या अनोख्या प्रेमकथेची तोंडओळख करून देणाऱ्या या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच ताणली गेली असणार. प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेची पूर्ती पुढच्या महिन्यात होणार आहे. १९ मे रोजी हा चित्रपट दिमाखात महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ओशियन कर्व्हज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवम पाटील आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गुड्डू देवांगन यांच्या कल्पनाशक्तीतून या चित्रपटाची कथा अवतरली आहे. ही कथा प्रत्यक्षात अवतरताना डीओपी म्हणून जबाबदारी पार पाडणारे पवन रेड्डी यांनी ती कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहे. ही अनोखी प्रेमकथा तितक्याच प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काळजाचा ठाव घेणारं संगीत स्वप्निल शिवणकर यांच्या कल्पक रचनांमधून अवतरलं आहे.

https://www.facebook.com/dilbedhundfilm/photos/a.117096481347291/118223057901300/

या चित्रपटामध्ये आपल्या संगीताने नवे रंग भरले आहेत स्वप्नील शिवणकर यांनी. या संगीताला खरा अर्थ प्राप्त झालाय तो के. स्वामी यांनी लिहिलेल्या गीतांनी. हंसराज जगताप व साक्षी चौधरीबरोबरच जयेश चव्हाण आणि आरती कुथे यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया या कलाकारांच्याही चित्रपटात उल्लेखनीय भूमिका आहेत. रवी पाटील आणि विनोद राजे यांनी चित्रपटाचं संकलन केलं असून अभिजित कुलकर्णी व विष्णू घोरपडे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ‘दिल बेधुंद’ चित्रपटाच्या पब्लिसिटी डिझाईनची जबाबदारी श्री. मुसळे यांनी पार पाडली आहे.