सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असताना विनाकारण व विनापरवानगी बाहेर फिरणाऱ्या 149 जणांची आज शाहूपुरी पोलिसांनी रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यामध्ये 16 जण बाधित सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधितांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित बिनधास्त रस्त्यांवर फिरत असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यामध्ये सोमवार मध्यरात्रीपासून कडक लॉकडाउन सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व पोलिस ठाण्यांना काल दिले होते. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाणे आज सतर्क होते. रस्त्यावर विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक तैनात करण्यात आली आहेत. शाहूपुरी पोलिसांनी करंजे नाक्यावर पथक तैनात केले होते. या वेळी या परिसरात अनेक जण विनापरवाना फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना अडवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
यावेळी काही मोकाट फिरत होते त्यांची या वेळी अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी घेतला. त्यानुसार तब्बल १५० जणांना अडवून त्यांची रॅट चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १६ जण बाधित असल्याचे समोर आले. कस्तुरबा रुग्णालयातील डॉ. दीपक थोरात यांनी या टेस्ट केल्या. पॉझिटिव्हिटीचा हा रेट पाहून सर्वांनाच धक्का बसला. बाधितांना तातडीने उपचारासाठी पाठविण्यात आले. या कारवाईत निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित यादव, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे, हवालदार हसन तडवी, कल्पना जाधव, धनंजय कुंभार, हिमंत दबडे आदी सहभागी झाले होते.