वारकऱ्यांना गुड न्यूज : पंढरपूरात आजपासून विठूरायाचे थेट पदस्पर्श दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून (२ एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. त्यामुळे करोनामुळं मागील काही काळापासून बंद असलेलं विठुरायाचं थेट दर्शनही आता भाविकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्या निमित्त विठ्ठल मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिलेली आहे.

कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 17 मार्च 2020 रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने अनेक नियम लागू केले होते. श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते, पदस्पर्श दर्शन बंदच होते. श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन सुरू करा अशी मागणी भाविकांकडून केली जात होती. आता करोनाची तिसरी लाट ओसरली असून, सरकारने निर्बंध देखील हटवले आहेत. त्यामुळे आजपासून श्री विठ्ठलाचे हे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

विठूरायाचं संपूर्ण देऊळ फळांनी सजवले

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. आजच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे चरण दर्शन सुरू झाले आहे. याच निमित्तानं विठूरायाचं संपूर्ण देऊळ हे फळांच्या मांडवान सजले आहे. देवाचा गाभारा रुक्मिणी मातेचा गाभारा चौखांबी याठिकाणी सफरचंद डाळींब अननस यासारख्या फळांनी आणि फुलांनी संपूर्ण मंदिर सजवले आहे. मंदिरातील सजावटीमुळे देवाचे रूप आणि मंदिर खुलून दिसत आहे. आजची सजावट पुणे येथील भाविक नानासाहेब मोरे यांनी केली आहे.

मनसेने वारकऱ्यांना पेढे वाटले

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. या प्रित्यर्थ मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी वारकऱ्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. दोन वर्षानंतर देवाचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. दर्शन घेऊन करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर मनसेच्या वतीने संत नामदेव पायरी जवळ जल्लोष साजरा केला.

Leave a Comment