औरंगाबाद – बोगस नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा परदरी तांडा येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डाव विद्यापीठ आणि तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या सतर्कतेमुळे उधळला असून या महाविद्यालयाविरुद्ध विद्यापीठ तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. थेट विद्यापीठाची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निकषानुसार परदरी तांडा येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयात कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत, यासंदर्भात काही जागरुक पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी विद्यापीठाने अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीच्या चौकशीमध्ये महाविद्यालयाची अद्ययावत पुरेशी इमारत नाही, ग्रंथालय नाही, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे नाहीत, अद्ययावत प्रयोगशाळा नाही, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके नाहीत, अर्हताधारक प्राचार्य नियुक्त नाहीत, अद्ययावत अभिलेख नाहीत, नियमितपणे लेखापरीक्षण नाही, अशा विविध अनियमितता आढळून आल्या.
दरम्यान, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी संस्थेने विद्यापीठाकडे ‘ना हरकत’ मागितली. पण, विद्यापीठाने अहवाल येईपर्यंत रोखली होती. त्याच काळात संस्थाप्रमुखांनी ‘ना हरकत’ देण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढविला. तेव्हा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सदरील प्रकरणाची सत्यता तपासली असता या महाविद्यालयास ‘नो ॲडमिशन’ कॅटेगिरीत टाकण्याच्या विद्यापीठ प्रशासनाला सूचना दिल्या. दुसरीकडे, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विद्यापीठातील कार्यक्रमात संस्थेचे जे. के. जाधव यांनी विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. तेव्हा मंत्री सामंत यांनी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयास या महाविद्यालयाच्या चौकशीचे आदेश दिले होते. जेव्हा तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने चौकशी सुरु केली. तेव्हा ‘एआयसीटीई’च्या पोर्टलवर या महाविद्यालयाने विद्यापीठाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र अपलोड केल्याचे दिसले आणि तेथूनच प्रशासन खडबडून जागे झाले. सहायक संचालकांनी यासंदर्भात विद्यापीठाकडे विचारणा केली तेव्हा त्या महाविद्यालयास अद्याप अशाप्रकारचे प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे सांगितले. विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण सहायक संचालकांनी सदरील ‘ना हरकत प्रमाणपत्राची’ सत्यता तपासली असता विद्यापीठाने गेल्या वर्षी दिलेल्या ‘ना हरकत प्रमाणपत्रात’ तारखेची खाडाखोड करुन ते यावर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ‘एआयसीटीई’च्या पोर्टलवर अपलोड केले होते. सदरील महाविद्यालयाने ‘एआयसीटीई’ व विद्यापीठाची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठामार्फत संबंधित प्राचार्य व संस्थेच्या व्यवस्थापनाविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.