बनावट कागदपत्रे बनवून नोकरीत घेण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचा बनाव करत शासनसेवेत लिपिकपदी सामावून घेण्यासाठी थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना वेळोवेळी निवेदन, व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून आत्महत्येची धमकी, देत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याविरोधात सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रशांत रामभाऊ साबळे (रा. रमानगर) असे आरोपीचे नाव आहे.

सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदविली. साबळे याने 1999 पासून पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले असल्याचे सांगून शासकीय सेवेमध्ये कोतवालपदी नियुक्ती द्यावी, असे विनंती अर्ज 13 डिसेंबर 2013 ते 2020 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयास दिले होते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून तो शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्तीस पात्र ठरत नसल्याचे त्यास कळविले. त्यानंतरही तो तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना भेटून आणि मोबाईलवर बोलून, मेसेज पाठवून नियुक्ती न दिल्यास आत्महत्या करण्याची सतत धमकी देतो. 29 ऑक्टोबर 2018 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली.

जिल्हाधिकारी चव्हाण रूजू झाल्यापासून साबळेने त्यांना भेटून लिपिकपदी नियुक्ती देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. या अर्जावर चव्हाण यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असता साबळेने तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केले नसल्याचे समजले. 3 डिसेंबर 2021 रोजी रात्री त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून धमकी दिली. 24 जानेवारीला पुन्हा जावक संकलनातील पुरावा पाठवत आहे, असा मेसेज पाठवून धमकावले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महिला अधिकाऱ्याने सोमवारी सिटी चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. सरकारी कामात अडथळा, बनावट कागदपत्रे बनविणे, फसवणूक, आत्महत्येची धमकी इ. कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.

Leave a Comment