हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ramgopal Varma) यांच्याविरोधात अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. चेक बाऊन्स प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या वर्मा यांना तीन महिन्यांत ३.७२ लाख रुपयांची भरपाई तक्रारदाराला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर त्यांनी ही रक्कम दिली नाही, तर त्यांना तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
रामगोपाल वर्मा यांच्याविरोधात २०१८ मध्ये ‘श्री’ नावाच्या कंपनीने त्यांच्या ‘कंपनी’ प्रॉडक्शन हाऊसविरोधात चेक बाऊन्स प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पुढे वर्मा यांच्या कंपनीने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. सात वर्षांपासून सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये वर्मा यांनी वारंवार गैरहजेरी लावली होती. यामुळे अखेर मंगळवारी न्यायालयाने त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घेत अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
दरम्यान, न्यायालयाने वर्मा यांना नुकसान भरपाईसाठी वेळ दिला आहे. मात्र दिलेल्या मुदतीत रक्कम भरली नाही तर त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल. यापूर्वी २०२२ मध्ये त्यांना पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. आता न्यायालयाने त्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहे.
महत्वाचे म्हणजे, ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’ आणि ‘सरकार’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या रामगोपाल वर्मा यांची कारकीर्द गेल्या काही वर्षात संपुष्टात आली आहे. बॉक्स ऑफिसवर त्यांचे चित्रपट गाजत नसल्यामुळे यामुळे वर्मा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर, याच आर्थिक अडचणीमुळे त्यांना आपले ऑफिस विकावे लागले होते. आता पुन्हा त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.