विमानात प्रवाशांना आता मास्क सक्ती; नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची साथ दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला. विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिले.

संचालनालयाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी मास्क बंधनकारक असण्याचा नियम लागू करण्यात येत आहे. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू करण्यात येत आहे.

कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेत दिल्ली, पंजाब या शहरात राहणाऱ्या नागरिकांना तेथील प्रशासनाच्यावतीने मास्कसक्ती करण्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील प्रशासन व राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तेथील प्रशासनाने कोरोना नियमावलीही जारी केली आहे. त्यामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालय तसेच इनडोअर आणि आउटडोअर बैठक, मॉल आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चोवीस तासात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण

कोरोनाच्या आकडेवारीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाची माहिती दिली आहे. सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन असून गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 5 हजार 58 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत एकूण 4 कोटी 36 लाख 54 हजार 64 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात मंगळवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 90 हजार 557 डोस देण्यात आले आहेत.