वातावरण तापलं!!! झेंडा काढण्याच्या कारणावरून 2 गटात राडा; 16 जणांना अटक

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे झेंडा काढण्याच्या कारणावरून 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कलम 144 लागू करण्यात आला आहे.

अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात. मात्र काल रात्री बारावाजेच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात राडा झाला. मध्यरात्री शहरवासीय झोपेत असताना हा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली.

 

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिसांची तुकडी सुद्धा बोलवण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी 16 जणांना अटक करण्यात आली असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी दिली आहे.