हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे दुकानांमध्ये महापुराची पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम तातडीने द्यावी,”अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विमा कंपनीला राज्यातील पूरग्रस्तांना 50 टक्के विमा रकमेचे वाटप करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, “विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कव्हरेजची किमान 50 टक्के रक्कम देण्यास सहमती दर्शवली आहे. तथापि, त्यांनी केंद्र सरकारकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयांना तसेच आयआरडीए ला निर्देश किंवा सूचना मिळवण्यावर भर दिला,”
पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची ५०% रक्कम तातडीने द्यावी. दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याचे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman जी यांना केली आहे. pic.twitter.com/f1xcgaTyeB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 29, 2021
विमा कंपन्यांचे प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, विमा कंपन्यांनी नुकसानीच्या मूल्यांकनासाठी नुकसान झालेल्या वस्तू काढू नयेत म्हणून आग्रह धरू नये. महसूल अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईच्या जागेची स्पष्ट छायाचित्रे घ्यावीत. मुल्यांकनात कोणताही गोंधळ होऊ नये, विमा कंपन्यांनी याचा विचार करावा.