सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे कोंढावळे व देवरूखकरवाडी येथील घरांवर कोसळली. तसेच पावसाच्या पाण्याबरोबर भल्या मोठ्या दरडी आणि मातीचा काही भागही कोसळला. देवरुखवाडीवर, कोंढावळे येथील भूस्खलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आज राज्य शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून तातडीची मदत म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वाई तालुक्यात आमदार पाटील यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून हे धनादेश वारसांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता अमर किर्दत, नगरसेवक चरण गायकवाड, राजेश गुरव, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी कोंढावळे येथील भुस्खलनात मृत झालेल्या वामन बाबाजी जाधव यांचे वारस यशवंत वामन जाधव, राहिबाई मारुती कोंढाळकर यांचे वारस रामचंद्र मारुती कोंढाळकर व भिमाबाई सखाराम वाशिवले यांचे वारस पार्वती दत्तात्रय शिळीमकर यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लवकरच एक लाखाचा धनादेश देण्यात येईल, असे यावेळी तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.