कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
देशाचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा जिल्हा कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशु पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि. 25) सकाळी 10.30 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, कराडचे उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, या प्रदर्शनामध्ये 100 विविध शासकीय उपक्रम व शेतकरी यांचेसाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सीताफळ प्रक्रिया, नाचणी, खपली गहू, शेवया, आवळा, सेंद्रिय गुळ, सेंद्रिय शेती, जवस, बेदाणा, हळद, प्रक्रिया केलेले आले, ज्वारी, तांदूळ, परदेशी भाजीपाला, दुग्धप्रक्रिया, राजगिरा, कडधान्ये, संत्रा यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विकास विभागामार्फत विविध पिकांच्या स्पर्धा आयोजित केल्या असून दि. 24 रोजी ऊस पिक स्पर्धा, दि. 25 रोजी केळी घड स्पर्धा, दि. 26 रोजी विविध फुले स्पर्धा, दि. 27 रोजी विविध फळे स्पर्धा व दि.28 रोजी भाजीपाला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.3001/-, द्वितीय पारितोषिक रु.2101/-, तृतीय पारितोषिक रु.1501/- आहे. या स्पर्धेसाठी कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, कराड यांचेशी संपर्क साधावा.
या प्रदर्शनामध्ये ड्रोन फवारणी, सोलर पंप, आच्छादित शेती, स्वयंचलित सूक्ष्म सिंचन, व्हर्टिकल फार्मिंग, बिन मातीची शेती (हायड्रोफोनिक्स), जैवइंधन आदींची प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने होणार्या जिल्हा कृषी महोत्सव योजनेतील राज्यातील पहिला जिल्हा कृषी महोत्सव देखील या कृषी प्रदर्शनादरम्यान आयोजित होत आहे.या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकर्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक गावातून शेतकरी सहलीचे आयोजन करण्याबाबत जिल्हा परिषद स्तरावरून कार्यवाही केली जाणार आहे.
यावर्षी लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुपक्षी प्रदर्शनामधून गाय, म्हैस स्पर्धा वगळण्यात आली आहे. मात्र शेळी मेंढी प्रदर्शन व श्वान प्रदर्शन नेहमीप्रमाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेमार्फत आयोजित केले जाणार आहे. कोरोना कालावधीत यात्रा / उत्सव बंद असल्यामुळे विरंगुळा म्हणून विविध मनोरंजन साधने व आकाशपाळणे लावणेबाबत शेतकरी संघटनाकडून मागणी झाली होती. त्या अनुषंगाने संरक्षित आकाशपाळणे लावले जाणार आहेत. कृषी प्रदर्शन यशस्वी होणेसाठी सर्व विभागानी सक्रीय सहभाग घ्यावा तसेच कृषी, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन विभाग व अंगीकृत उपक्रम यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जास्तीत जास्त शेतकर्यापर्यंत पोहोचवाव्यात अशा सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
दि. 25 नोव्हेंबर रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या कराड दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, नगरपालिका, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सर्व उपाययोजना करणेचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमास महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून जिल्यातील सर्व राज्यसभा, लोकसभा, विधानपरिषद व विधानसभा सदस्य यांना देखील विशेष निमंत्रित केले जाणार आहे.
कृषी प्रदर्शनात संरक्षित शेतीची संकल्पना
गेल्या अनेक दिवसात शेतकर्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे हातामध्ये आलेले वाचविताना शेतकर्यांची दमछाक होते. यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी आच्छादित शेतीकडे वळावे यासाठी यावर्षी संरक्षित शेती हि संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिके, मॉडेल्स व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार असल्याच जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.