अकोला प्रतिनिधी । शासकीय मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पाय चेपून घेतानाचा शिक्षिका शितल अवचार हिचा विडिओ झाला होता. त्यानुसार या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणावर आता जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षिकेला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. पोस्को कायद्यान्वये महिलेला शिक्षा ठोठावण्याचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच खटला आहे.
अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शासकीय मुकबधीर विद्यालयात कार्यरत शितल अवचार ही महिला शिक्षिका मुकबधीर विद्यार्थ्यांकडून पायांची मालीश करून घेत होती. माध्यमांत याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिका आणि तिच्या सहकार्यांविरोधात पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. शहरातील मलकापूर परिसरात असलेल्या शासकीय मूकबधीर विद्यालयात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यांने १३ ऑक्टोबर २०१३ रोजी खदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
दरम्यान काल जिल्हा व सत्र न्यायालयाने शितल अवचार हिला पाच वर्षे कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे पाय चेपतानाचा व्हिडिओ शाळेतील मुलांनी काढला होता त्याआधारे शितल अवचार हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.