सातारा | जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण 183 रुग्णांची जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम रु. 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश काढण्याबात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे.
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे ? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे अगर कसे ? याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 63 हॉस्पिटलसाठी 63 ऑडीटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकामार्फत एकूण 63 हॉस्पिटलमधील 4579 एवढ्या रुग्णांच्या बीलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रुग्णालयांनी रक्कम रु. 22 कोटी 62 लाख 20 हजार 239 इतकी रक्कम आकारण्यात आली होती. सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना 28 हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.