हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे , देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा खळबळजनक आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. मात्रं सचिन वाझे याचा आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे असं प्रत्त्युत्तर अनिल देशमुख यांनी दिले. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अनिल देशमुख आता सगळीकडे अडकले आहेत. म्हणून ते आता खोटे बोलत आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, आणि एसपी मुंढे या तिघांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. वाझेंना नोकरीवर घ्या सांगा असे सांगणारे उद्धव ठाकरे होते. वाझे वाझे काय करतात तो काय लादेन आहे का? असे उद्धव ठाकरे बोलले होते. आता वाझे बोलतात तर ते बोंबा मारतायत असं म्हणत गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
काय आहे प्रकरण?
१०० कोटी वसुली प्रकरणावरून मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असताना आज अचानकच तुरुंगात असलेल्या सचिन वाझे या मुख्य आरोपीने जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला. अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे असं म्हणत सचिन वाझे याने बॉम्ब फोडला. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत हा आरोप फेटाळून लावला. मी चार, पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि वस्तूस्थिती जनतेसमोर आणली होती. कि कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मला प्रतिज्ञापत्र पाठवले होते आणि माझ्यावर दबाव आणला होता. हि परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली. त्यानंतर फडणवीस यांनी नवीन चाल खेळली आहे. सचिन वाझे जे काही बोलला ती फडणवीसांची चाल आहे असं अनिल देशमुख म्हणाले होते.