औरंगाबाद | जिल्हा प्रशासनाने संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट उभे असतानाच महापालिका आणि महावितरण यांनी मार्च महिन्याचे कारण पुढे करत वसुली सुरू केली आहे. लाॅकडाऊन कुठल्याही नागरिकाचे वीज कनेक्शन तोडू नये, किंवा महापालिकेने कराची वसुली करू नये, अशी मागणी भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड यांनी केली आहे.
जिल्ह्यात ३१ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान पुर्ण लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने वीज कनेक्शन तोडू नका, महापालिकेने मालमत्ता कराची वसुली सक्तीने करू नये याचा समावेश आहे. या शिवाय कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, लसीककरण मोहिमेला वेग देणे या विषायवर देखील कराड यांनी आपली भूमिका मांडली.
डाॅ. कराड म्हणाले, कोरोना रुग्णाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे , रुग्णांना उपचार सुविधा वेळेवर देणे यासह ग्रामीण भागामध्ये बाधितांचे प्रमाण वाढत असल्याने जास्तीत जास्त लसीकरण केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट करत याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणाची मोहीम वाढविण्याची आवश्यकता आहे. सध्या ग्रामीण भागात संसर्गाचा वेग वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे सुरू करावी, इतकेच नव्हे तर मोठ्या कंपन्या व कारखाने यामध्ये कामगारांचे देखील लसीकरण करून घेण्यावर भर देण्यात यावा. मोठ्या कारखान्यांनी त्या ठिकाणी लसीकरण कॅम्प सुरू करावे, जेणेकरून कामगारांना त्याचा फायदा होईल. सध्या शहरांमध्ये ४५ आणि ग्रामीण भागामध्ये ६० इतकी लसीकरण केंद्रे आहेत. वाढत्या संसर्गाचा वेग लक्षात घेऊन लसीकरण केंद्रे सुरू करावीत,अशी मागणी देखील श्री. कराड यांनी केली आहे.
सध्या मार्च अखेर सुरू असल्याने महानगरपालिकेने वसुलीसाठी पथक निर्माण केले आहेत. लोक संकटात असताना महानगरपालिकेची वसुली जोरात सुरू आहे. तशीच स्थिती महावितरणची देखील आहे. विद्युत बिलाच्या वसुलीसाठी कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे अधिकारी सर्वसामान्यांना वेठीस धरत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा